नगर तालुक्यात अल्पवयीन मुलीची छेडछाड;केडगावमध्ये महिलेसह कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

घरात घुसून मारहाण; चौघांविरुद्ध कोतवालीत गुन्हा

अहिल्यानगर – केडगाव उपनगरातील भूषणनगर भागात अनधिकृत बांधकामाची महापालिकेत तक्रार केल्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भूषणनगर, दत्त चौक येथील रहिवासी उषा मुनोत (वय ६१) यांच्या घरासमोर आरोपींचे बांधकाम सुरू होते. बांधकाम बंद का पाडले आणि त्याची महानगरपालिकेकडे तक्रार का केली, असा जाब विचारत आरोपींनी वाद घातला. या वादातून आरोपी शुभम आहिरे आणि किशोर मडके यांच्या मुलाने हातातील लाकडी दांडक्याने मुनोत यांना मारहाण केली. तसेच शुभम आहिरे याची आई व किशोर मडके यांच्या पत्नीने मुनोत यांच्या नातेवाईकांना मारहाण करत घराच्या दिशेने दगड आणि विटांची फेकाफेक केली.

जखमी अवस्थेत मुनोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी शुभम आहिरे, त्याची आई, किशोर मडके यांची पत्नी व मुलगा अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

————————————————————————————————————————–

अल्पवयीनची छेडछाड; तालुका पोलिसात संशयितावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर – तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मोटारसायकलवरून पाठलाग करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संशयित आरोपी हा मागील पाच ते सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा मोटारसायकलवरून सातत्याने पाठलाग करत होता. २४ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास त्याने मुलीचा हात पकडून तिच्या लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच संशयिताने त्याच्या भ्रमणध्वनीवरून मुलीच्या नातेवाईकांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तू मला आवडतेस, माझ्यासोबत फिरायला चल असे म्हणत वारंवार त्रास दिला.

अखेर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles