श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव-वेताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना भरधाव कारने धडक दिल्याप्रकरणी कारचालक शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आकाश हरिचंद्र बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ब्राह्मणगाव ते शिरसगाव जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर (कार क्रमांक एमएच १४ बीव्ही २१५१) चा चालक शिक्षक कुंडलिक म्हाळूदास शिरोळे याने कार भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. यावेळी शाळेतून घरी जात असलेल्या विद्यार्थ्यांना कारची धडक बसली.
या अपघातात आकांक्षा आकाश बर्डे, केशव आकाश बर्डे, वैभव अमोल बर्डे, प्रिती अमोल बर्डे, प्रांजल बाळासाहेब तोरणे आणि श्रद्धा बाळासाहेब तोरणे हे विद्यार्थी जखमी झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (अ) (ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिंदे पुढील तपास करीत आहेत.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या केशव आकाश बर्डे (वय ६), वैभव अमोल बर्डे (वय ६) या दोघांना गुरुवारी सायंकाळीच लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित सहा पैकी चार जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. मात्र काल शुक्रवारी दुपारनंतर आणखी तिघांना त्रास होऊ लागल्याने प्रीती अमोल बर्डे (वय ८), प्रांजल बाळासाहेब तोरणे (वय ७) आणि श्रद्धा बाळासाहेब तोरणे (वय १२) यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच झाली आहे.


