केडगाव-दौंड रोड परिसराला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाचे लोकार्पण
माजी सभापती मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांना वाहतुकीसाठी जवळचा मार्ग उपलब्ध
वाढत्या शहरीकरणाबरोबर रोजगाराचा प्रश्न निर्माण – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर : केडगाव-दौंड रोड परिसराला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाचे लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. माजी सभापती मनोज कोतकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा मार्ग साकार झाला असून आता या परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी कायमस्वरूपी जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी शहराकडे येत आहेत. त्यामुळे वाढत्या शहरीकरणाबरोबरच रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरांमध्ये झोपडपट्ट्या निर्माण होऊ नयेत यासाठी युवकांच्या हाताला काम देणे गरजेचे असून औद्योगिक वसाहती वाढविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
केडगाव उपनगरातील नागरिकांनी युतीचे १२ नगरसेवक निवडून दिले असून या भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. केडगाव येथील देवी मैदानाचे लवकरच काँक्रिटीकरण करण्यात येणार असून शहरालगत वाहणाऱ्या सीना नदीचे सौंदर्यीकरण जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरात रस्त्यांचे जाळे उभे राहिले आहे. अनेक वर्षांनंतर केडगावमध्ये येताना सर्वत्र काँक्रिटीकरण झालेले रस्ते पाहायला मिळत आहेत, असेही विखे पाटील म्हणाले. खाजगी शिकवणी क्लासच्या वाढत्या फीमुळे सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती डळमळीत होत असून या फी वाढीला विरोध करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर अॅड. धनंजय जाधव, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेवक मयूर बांगरे, नगरसेविका कोमल कोतकर, अश्विनी लोंढे, माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, जालिंदर कोतकर, सुमित लोंढे, अमोल येवले, विजय पठारे, सुरज कोतकर, महेंद्र कांबळे, अजित कोतकर आदींसह अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शहरालगत बायपासची निर्मिती केली, तर शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची अनेक कामे मार्गी लावण्यात आली आहेत. पूर्वी शहरात विकासकामांचा अभाव होता, त्यामुळे मूलभूत प्रश्नांपासून कामे सुरू करावी लागली. नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुलभ व्हावा यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील चौकांमध्ये मुंबईच्या धर्तीवर सिग्नल बसविण्याचे काम सुरू असून महामार्गांवर पथदिवे बसवले जात आहेत. तसेच शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला असून पोलिसांना गुन्हेगार शोधण्यात मदत होत आहे.
माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले की, केडगाव व दौंड रोड परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी कायनेटिक चौक व पुणे महामार्गाचा मार्ग वापरावा लागत होता. हा मार्ग लांब असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनाही या मार्गावरूनच जावे लागत असल्यामुळे अपघाताची शक्यता होती. नागरिकांचा सुरक्षित व जवळचा प्रवास व्हावा यासाठी रेल्वे भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती. यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यामुळे हा मार्ग साकार झाला.
सुजय विखे हे आमच्या मनातील खासदार असून केडगाव परिसराच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणखी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच केडगावचे ग्रामदैवत रेणुका माता मंदिराजवळील मोकळ्या जागेचा वापर यात्रेसाठी केला जातो. पावसाळ्यात येथे भक्तांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेवक मयूर बांगरे यांनी मानले.


