अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा स्थगित; मुख्यमंत्री फडणवीसांचे घरातून काम करण्याचे आवाहन

मुंबईसह राज्यातील अतिवृष्टी, वेगवान वारे आणि निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींना सतर्क राहण्याचे आवाहन केले. शासन आणि प्रशासनाला योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्यातील एकूण परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अध्यक्षांनी त्या दिवसाचे विधानसभेचे कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली. तसेच विधानसभेची पुढील नियमित बैठक उद्या सकाळी ११ वाजता होईल, असे त्यांनी सभागृहात जाहीर केले.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच विजय वडेट्टीवार, अजय चौधरी आणि अमित पटेल सदस्यांनी सांगितले की, मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक झाडांची वेळेत छाटणी न झाल्यामुळे नागरिकांचा जीव जात आहे, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला तातडीने झाडांची छाटणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर मुंबईत मोठ्या खर्चातून उभारण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवर अनेक ठिकाणी तडे गेल्याचा मुद्दाही सभागृहात उपस्थित करण्यात आला. या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत, ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी विरोधी पक्षाने केली.

मुख्यमंत्री उत्तर देताना म्हणाले की, राज्यासमोर अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर असले तरी यावेळी निसर्गाचा प्रकोपही तितकाच मोठा आहे. रविवारी मुंबईत सुमारे ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. दरवर्षी पावसाळ्यात सरासरी ८०० झाडे कोसळतात; मात्र यावेळी एका दिवसातच सुमारे ३५० झाडे पडली आहेत. आजची परिस्थिती त्याहीपेक्षा गंभीर असून दुपारनंतर ७० ते ९० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्क फ्रॉम होमचे आवाहन करण्यात आले असून शाळा आणि महाविद्यालयांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. काल घडलेली इमारत दुर्घटना ही पूर्णपणे बेकायदेशीर इमारतीशी संबंधित होती. त्या इमारतीतील रहिवाशांऐवजी शेजारील झोपड्यांवर इमारत कोसळल्याने तेथील नागरिकांचा मृत्यू झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई-पुणे मार्गावरील दरड कोसळल्यानंतर तातडीने वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था करण्यात आली. नागरिकांना सतत सूचना देण्यात आल्या असून अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलीस, महसूल आणि इतर सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री गिरीश महाजन यांनीही रात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

गेल्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या सर्व दुर्घटना, त्यावरील कारवाई, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच पावसाळ्यापूर्वीच्या तयारीबाबतचे सविस्तर निवेदन तयार असून आजची परिस्थिती लक्षात घेता ते मंगळवारी सभागृहात मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, झाडे, धोकादायक इमारती आणि दुर्घटनाप्रवण ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले. विशेषतः तरुणांनी पावसाळी पर्यटन, धबधबे आणि डोंगराळ भागातील सहली टाळाव्यात, असेही त्यांनी सांगितले. राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत सातत्याने परिस्थितीचा आढावा घेतला जात असून सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चर्चेच्या शेवटी विधानसभा अध्यक्षांनीही राज्यातील अतिवृष्टीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी सतर्क राहून शासन आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी विधानसभेचे उर्वरित कामकाज स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. विधानसभेची पुढील बैठक मंगळवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याचेही अध्यक्षांनी जाहीर केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles