विहिरीच्या पाणीउपशावरून नेप्तीमध्ये तुंबळ हाणामारी
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर – सामायिक विहिरीचे पाणी उपसण्याच्या कारणावरून नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे दोन गटांत जोरदार राडा झाला. विहिरीवर पाणी उपसण्यास मज्जाव करत आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबाला दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल अण्णा राऊत हे आपल्या घरासमोर असताना आरोपी संजय केर राऊत, स्वराज संजय राऊत आणि वैशाली संजय राऊत यांनी त्यांना विहिरीचे पाणी उपसण्यावरून हटकले. तू आमच्या विहिरीचे पाणी उपसायचे नाही आणि विहिरीवर यायचे नाही, असे म्हणत आरोपींनी वाद घातला. ही आपली सामायिक विहीर असून त्यावर आमचाही हक्क आहे, असे फिर्यादीने सांगताच आरोपींचा राग अनावर झाला. त्यांनी फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. संजय राऊत आणि वैशाली राऊत यांनी हातातील दगड आणि काठीने विशाल यांना जबर मारहाण केली. त्याच वेळी स्वराज राऊत याने फिर्यादीचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला आणि आई-वडिलांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अपमानित केले. पुन्हा विहिरीवर आलात तर कुर्हाडीने तुकडे करून टाकू, अशी धमकीही यावेळी देण्यात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस हवालदार जंबे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


