शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात भीषण दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी चाकू व तलवारीचा धाक दाखवत घरातील कपाटे फोडून सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे नागलवाडी व परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगराळ भाग व मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या नागलवाडी गावातील सेवानिवृत्त शिक्षक राम मारुती गीते हे पत्नी छाया गीते यांच्यासह शुक्रवारी रात्री घरी झोपलेले असताना मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर दरोडेखोरांनी दोघांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवत घरातील कपाटांची उचकापाचक केली. दरोडेखोरांनी घरातील सुमारे ५५ तोळे सोन्याचे दागिने, महिलांच्या अंगावरील मौल्यवान दागिने तसेच रोख रक्कम असा अंदाजे ७० ते ८० लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच शनिवारी सकाळी पोलिस उपअधीक्षक राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
या धक्कादायक घटनेमुळे नागलवाडी, गोळेगाव व कोनोशी परिसरात नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. ग्रामीण भागातील घरांवर सशस्त्र दरोड्यांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
मागील दरोड्याचा तपासही रखडला
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी बोधेगाव परिसरातील खिळे वस्तीवर मकरसंक्रांतीच्या मध्यरात्री वैद्य नामक पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांवर मारहाण करून दरोड्याची घटना घडली होती. मात्र त्या घटनेचा अद्याप तपास लागलेला नसल्याने शेवगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांचा संताप; चौकशीची मागणी
तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. काही नागरिकांनी पोलिस व गुन्हेगारांमध्ये संगनमत असल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


