नाशिकमध्ये यंदा सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभ मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात लाखो साधू, संत आणि भाविक या मेळाव्यासाठी नाशिकमध्ये एकवटतील.
या पार्श्वभूमीवर नाशिक येथे हिंदू हित रक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सुचीचे प्रकाशन राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी ‘कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर उखडून टाका’ असे विधान केले आहे. ‘हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. मी खारघरला अशीच भूमिका मांडली. आजूबाजूला जिहादी लोकांची दुकानं होती. तेव्हा मी बोललो, नंतर माध्यमांनी मला झोड-झोड झोडले. पण मला तेव्हाही काही वाटले नाही आता ही काही वाटत नाही. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंबाबत नाही बोलायचे का? मग पाकिस्तान, इस्लामाबाद विषयी बोलणार का? आम्ही धर्माधर्मात भांडणे लावतो असे म्हणतात. ते जे बोलतात त्यांनी येऊन सांगावे’ असे नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे म्हणाले की, आता कुंभमेळ्याची कामे जोरात सुरू आहेत. तुमच्या मागण्या सरकारकडे देतो. कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक, भीती वाटली पाहिजे. मी मागे त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो होतो, तिथे दुकानावर नाव वेगळे होते. आतमध्ये अब्दूल बसलेला होता. त्यांना आता विषय कळला आहे. आम्ही आता देशात कार्यक्रम सुरू करणार आहोत की, हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू घेतल्या पाहिजे. मी इथे आमदार, मंत्री म्हणून नाही तर हिंदू म्हणून आलो आहे. कुंभमेळ्यात लक्ष ठेवा. कोणी इथे स्टॉल लावण्यासाठी आले तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत.


