नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन शुक्रवारी (२० मार्च) सायंकाळी राजीनामा सुपूर्द केला.
अशोक खरात याच्यावर अनेक महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप असून, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ तपासासाठी जप्त केले आहेत. अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या खरातच्या कृत्यांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अशोक खरातला ‘गुरू’ मानल्याचे समोर आले. त्यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर त्यांनी वैयक्तिक कारणांचा दाखला देत पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, या घडामोडीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नव्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी या पदासाठी काही अराजकीय आणि अनुभवी व्यक्तींची नावे सुचवली आहेत. त्यांनी निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, ॲड. वर्षा देशपांडे, ‘मासूम’ संस्थेच्या मनिषा गुप्ते तसेच निवृत्त आयएएस अधिकारी मेधा गाडगीळ यांसारख्या व्यक्तींना संधी देण्याची गरज व्यक्त केली आहे.“चमकोगिरी करणाऱ्यांपेक्षा निष्पक्ष, निर्भीड आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तींची नियुक्ती झाली तरच पीडित महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल,” असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. सध्या महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त झाले असून, आता या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/2035370012647866393?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2035370012647866393%7Ctwgr%5Ef7c3e19b10377e7fe0eddb0162fb7e0020a236c5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Frohit-pawar-suggests-4-names-for-maharashtra-women-commission-chairperson-after-rupali-chakankar-resignation-pps-96-5787339%2F
रोहित पवारांकडून महिला आयोगाच्या नव्या अध्यक्षासाठी सुनेत्राकाकींना सुचवली ‘ही’ चार नावे
- Advertisement -


