बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. एकीकडे राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तयारी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. आता या पोटनिवडणुकीत काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनुसार, पक्षाकडून आदेश आल्यास सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार मैदानात उभा राहण्याची शक्यता आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. अजित पवार यांच्या रिक्त विधानसभा जागेवर काँग्रेस पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गटाने निवडणूक लढवली नाही, तर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिले तर निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्हा काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवला आहे. वरिष्ठ नेतृत्वांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढेल, असे पुणे जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. पुणे काँग्रेस भवन इथे ही बैठक पार पडली. एकीकडे शरद पवार गटाने पोटनिवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर मोठं भाष्य केलं होतं. ‘बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवार गटाने भूमिका स्पष्ट करावी. लोकसभा ,विधानसभा निवडणूकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लढवली होती. ते जर लढत नसतील, तर त्यानंतर आमच्या कडे अनेक पर्याय असतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता.


