अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण

महिलांचे लैंगिक शोषण कऱणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्याशी धार्मिक कामाशिवाय कोणताही संबंध आला नाही. त्याचे कौतुक केल्याच्या भाषणाची क्लीप अर्धवट असून, चार वर्षांपूर्वीची आहे, असे स्पष्टीकरण आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिले आहे. दरम्यान, भोंदू खरातच्या कृत्यांचा निषेध करत, त्याला योग्य शिक्षा झालीच पाहिजे, असे मत हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत व्यक्त केले.

पोपटराव पवार व हिवरे बाजारने केले भोंदूबाबाचे कौतुक करून त्याला मदत केल्याची बातमी समाजमाध्यमांवर फिरत आहे. ग्रामस्थांनी या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. गेल्या 35 वर्षांच्या कष्टामुळे आज हिवरे बाजारचे नाव ‌‘पद्मश्री‌’सारखा सन्मान मिळून जगाच्या नकाशावर गेलेले आहे. अशा परिस्थितीत वाईट वृत्तींना पाठबळ देण्याचे काम कदापि हिवरे बाजारकडून शक्य नाही, त्यामुळे ही बातमी चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आली, असे या वेळी सांगण्यात आले.

पोपटराव पवार यांनी सांगितले, की ग्रामस्थांनी सन 2012 मध्ये जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भिंगार येथील दगडी काम करणाऱ्या कारागिरांची भेट घेतली. त्यांनी याआधी इतर ठिकाणी दगडात बांधलेल्या मंदिरांची पाहणी केली. त्यात राशीन, नेवासा येथील मंदिरांबरोबरच मिरगाव (ता.सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिराचे दगडी काम पाहण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर हिवरे बाजार ग्रामस्थांनी 2012-13 मध्ये विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या कलशारोहण समारंभासाठी आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात खरातलाही निमंत्रण होते. त्यानुसार तो उपस्थित होता.

मात्र सध्या समाजमाध्यमांवर जी बातमी फिरत आहे, त्यातील व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा असून, तो कार्यक्रम मिरगाव (सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिरातील वृक्षारोपण कार्यक्रमावेळचा आहे. तेथे वारकरी संप्रदायातील 10 ते 12 मंडळींसोबत हजारोवर जनसमुदाय होता. तोपर्यंत खरातची विकृत प्रवृत्ती माहिती नव्हती. त्यानंतर नाशिकमध्ये इतर कार्यक्रमांत खरातशी बोलण्याचा संबंध आला. त्यातही हिवरे बाजारचे धार्मिक कार्य सोडून खरातशी संबंध आलेला नाही.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या समवेत संतांच्या व्यासपीठावर जाण्याचा योग मला आला. कैलास व मानसरोवर या प्रमुख नद्यांची यात्रा करायला मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय दोन दिवसांचे शिबीर (दिवंगत) नरेंद्र दाभोलकर यांनी हिवरे बाजारला घेतले होते. हिवरे बाजार कायम विकासाभिमुख असून, राज्य आणि देशाच्या विकासासाठी आघाडीवर आहे. मात्र कुठलीही घटना घडली त्याच्याशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तीवर जबाबदारी टाकणे हे चुकीचे आहे. हिवरे बाजार हे गेल्या 35 वर्षांत कुठल्याही वितंडवादात पडलेले नाही, असेही पोपटराव पवार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles