नगर शहरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला विशेष पोक्सो न्यायाधीश डॉ. यू. जे. मोरे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. युसुफ हमीद कुरेशी (वय 34, रा. गाझीनगर, काटवन खंडोबा, अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवत शिक्षा ठोठावली असून, एकूण 22 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये पीडिता तिच्या घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला खाऊचे आमिष दाखवून अहिल्यानगर येथील एका मंगल कार्यालयात नेले व तिच्यावर अत्याचार केला. त्या वेळी आरोपी तेथे पहारेकरी म्हणून कार्यरत होता. घटनेनंतर दुसर्‍या दिवशी पीडितेच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला विशेष पोक्सो न्यायालय तसेच जिल्हा न्यायाधीश कोर्ट क्रमांक 6 येथे चालला. या प्रकरणात एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी व रासायनिक विश्लेषक यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. निकाल देताना न्यायालयाने नमूद केले की, पीडित मुलीचा जन्म 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी झाला असून, प्रत्येक बालिकेला सुरक्षितता, निर्भयपणे जगण्याचा व खेळण्याचा अधिकार आहे. मात्र आरोपीच्या कृत्यामुळे तिचे हे स्वातंत्र्य व सुरक्षिततेची भावना हिरावली गेली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. राजेश आर. त्रिमुखे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, अंमलदार आर. डी. आडसुळ, याकुब सय्यद, सचिन डमाळे यांनी साहाय्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles