मुंबई : अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन जायच्या असा गौप्यस्फोट राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी केला. एबीपी माझाशी बोलताना आशा मिरगे यांनी रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना चाकणकरांची कार्यशैली आणि अशोक खरात याच्यासंबंधी अनेक आरोप केले.
कुंपणच शेत खाते असं आपण ऐकलं होतं. पण इथं कुंपणच आख्ख शेत लांडग्यापुढे टाकतंय असा प्रकार घडला असा आरोप आशा मिरगे यांनी रुपाली चाकणकरांवर केला. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना कुठल्याही महिलेल्या आपल्या वाटल्या नाहीत, त्यांची उठबस नेहमी मंत्र्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये असायची असं मिरगे म्हणाल्या. दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर हे अशोक खरातच्या पार्टनर असल्याचा आरोप आशा मिरगे यांनी केला. त्या म्हणाल्या की, “अशोक खरातसोबत संबंध ठेवणाऱ्यांमध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत. त्यामध्ये त्यांचे काही मित्रदेखील आहेत. काही लोक अशोक खरातचे पार्टनर असून त्यामध्ये दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकरांचा नंबर येतो.
आपल्या आजूबाजूच्या महिलांना आवर्जून अशोक खरातकडे न्यायचं काम रुपाली चाकणकर करायच्या असा थेट आरोप आशा मिरगे यांनी केला. त्या म्हणाल्या की, “महिला संघटनांची मिटिंग असताना त्या मिटिंगला अशोक खरात जायचा. त्या मिटिंगमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातची स्तुती करायच्या. हा माझा पांडूरंग आहे, मी आज जिथे आहे तिथपर्यंत यांच्यामुळे पोहोचले असल्याचा दावा चाकणकर करायच्या. त्यामुळे समोर बसलेल्या भोळ्या भाबड्या महिला फसायच्या. त्या भोळ्या भाबड्या महिलांना अशोक खरातच्या जाळ्यात टाकायच्या.


