जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांचा इशारा

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांचा इशारा; थकीत मानधन न मिळाल्यास तीव्र आंदोलन
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील अनेक महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आता कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जल जीवन मिशन तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील चार महिन्यांचे मानधन प्रलंबित आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काही कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे मानधनही थकीत असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात संबंधित कृती समितीने शासनाला अनेक वेळा निवेदने देऊन, तसेच विविध बैठकींमधून मानधन तात्काळ अदा करण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कृती समितीच्या निवेदनानुसार, 25 एप्रिल 2026 पर्यंत थकीत मानधन अदा न झाल्यास राज्यस्तरीय कामबंद आंदोलन पुन्हा छेडण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन, विभागीय कार्यालयांसमोर धरणे व आवश्यक असल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याशिवाय 8 एप्रिल 2026 पासून जिल्हा स्तरावर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार असून, 20 एप्रिलपासून असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णयही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
दरम्यान, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन न मिळाल्यास योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन प्रलंबित मानधन अदा करावे, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles