महापालिकेकडून सर्जेपुरा रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा; आमदार संग्राम जगताप यांची पाहणी
आधी हिरवे अतिक्रमण काढा, मग आम्ही आमची काढू – आमदार संग्राम जगताप
अहिल्यानगर : शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि डीपी रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्णत्वास नेण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्जेपुरा रोडवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईची आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला विविध सूचना दिल्या. यावेळी त्यांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज्य शासनाकडून शहरातील डीपी रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणण्यात आला असून गेल्या एक वर्षापासून विविध रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये अडथळा ठरणारी अनेक अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी दुहेरी निकष लावले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहराच्या विकासासाठी रस्ते रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण अत्यंत आवश्यक आहे. अनेक नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करत स्वतःहून आपली अतिक्रमणे आणि हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक स्थळे मागे घेतली. शहराच्या विकासाला प्राधान्य देत त्यांनी मोठा त्याग केला. मात्र काही प्रवृत्तींकडून अतिक्रमणे कायम ठेवली जात आहेत आणि त्यावर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे.
ते पुढे म्हणाले की, अचानक रस्त्याच्या कडेला थडगी उभी करणे, त्यांना रंगरंगोटी करणे आणि त्याच्या आडून रस्त्यांमध्ये अतिक्रमण निर्माण करणे ही गंभीर बाब आहे. अशा अनधिकृत थडग्यांचे वाढते प्रमाण हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. विकासकामांसाठी जर हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात असेल, तर इतर अनधिकृत अतिक्रमणांवरही समान निकष लावले गेले पाहिजेत. प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता सर्व अतिक्रमणांवर एकसमान कारवाई करावी.
“आधी हिरवे अतिक्रमण काढा, मग आम्ही आमची काढून घेऊ,” अशी भूमिका मांडत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला. हिंदूंना वेठीस धरण्याचे काम प्रशासनाने करू नये. विकासकामांच्या नावाखाली एकाच समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणीही तितक्याच निष्पक्षपणे झाली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


