‘आरटीई’ प्रवेशासाठीची निवडयादी जाहीर, १ लाख ५ हजार ५८२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी…

 शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतून एकूण १ लाख ५ हजार ५८२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. त्यात सर्वसाधारण गटातील १ लाख ५ हजार २२९, तर दिव्यांग गटातील ५८२ विद्यार्थ्यांचा समावेश असून, या विद्यार्थ्यांना ११ ते २० एप्रिल या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘आरटीई’अंतर्गत राज्यातील ८ हजार ७०१ शाळांतील १ लाख १४ हजार २८५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या जागांसाठी २ लाख ८९ हजार ३८५ अर्ज दाखल झाले. प्रवेशाच्या जागांपेक्षा अर्जांची संख्या जास्त असल्याने ६ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली. त्यातून १ लाख ५ हजार २२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. तर ८६ हजार ३४ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वसाधारण गटातील ८६ हजार ४, तर दिव्यांग गटातील ३० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोंदणीकृत मोबाइलवर प्रवेशासाठी लघुसंदेश (एसएमएस) पाठवण्यात येणार आहेत. मात्र, पालकांनी केवळ लघुसंदेशावर अवलंबून न राहता https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून सोडत तपासून प्रवेशासाठी निवड झाली आहे की नाही, याची माहिती घ्यावी.

सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्याकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी समितीमार्फत पडताळणी करावी. पडताळणी समितीने प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणित केल्यानंंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रत उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, यंदा आरटीईअंतर्गत प्रवेशासाठीच्या अर्जांची संख्या घटली आहे. गेल्यावर्षीच्या प्रवेशप्रक्रियेत ३ लाख ५ हजार १५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ८८ हजारांपेक्षा अधिक जागांवर प्रवेश घेतल्याने सर्वाधिक प्रवेश झाले होते. तसेच सुमारे २१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठीची निवडयादी, प्रतीक्षायादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार निवडयादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेश फेऱ्या राबवण्यात येतील. जूनपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालक.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles