मस्साजोगच्या रिक्त झालेल्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही….

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच पैकी केवळ तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता अश्विनी देशमुख – स्वरूपानंद देशमुख अशी मस्साजोगच्या सरपंच पदासाठी लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आले. त्यामुळे, गेल्या आठवडाभरापासून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या मस्साजोग सरपंचपदाची निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले असून देशमुख विरुद्ध देशमुख असाच सामना रंगणार आहे.

मस्साजोगच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांपैकी संजिवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा देशमुख या तीन उमेदवारांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर, मागील सरपंचपदाच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत होणारे स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. या पोटनिवडणुकीसाठी 28 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 29 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, आता, मस्साजोगचा सरपंच कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. सरपंच पदावरुन संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहून पतीला न्याय कसे भेटेल हेच त्यांनी पाहिलं पाहिजे, असा सल्लाच स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांना दिलाय. दिवंगत संतोष देशमुख यांच्या न्यायिक लढाईसाठी आजही गाव पाठीशी आहे आणि उद्याही राहील. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचं गाव एकत्र आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्व ग्रामस्थांचा उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, मी ही निवडणूक लढवणार असल्याचे स्वरुपानंद देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles