जनगणनेच्या कामासाठी नेमणूक , जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ब्रेक ; ग्रामविकास विभागाचे आदेश

जनगणनेच्या कामासाठी नेमणूक असणार्‍या क व ड वर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ब्रेक

ग्रामविकास विभागाचे आदेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जनगणनेचे काम सुरू असल्याने यातून कर्मचार्‍यांना सूट द्यावी अशा आशयाचे पत्र केंद्रीय गृह विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी वर्गाच्या बदल्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ग्रामविकास विभागाने जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील (जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षकांसह) कर्मचार्‍यांची बदली प्रक्रीया राबवू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे जि.प. कर्मचार्‍यांसह शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक लागला आहे.
दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांची बदली प्रक्रीया राबविली जाते. त्याअनुषगांने प्रशासनाने बदली प्रक्रीया सुरू करत, सेवाजेष्ठता याद्या विभागांकडून मागविल्या होत्या. दुसरीकडे देशात जनगणना प्रक्रीया सुरू झाली आहे. यात, प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच इतर कर्मचार्‍यांची यादीही विभागाने मागवून घेतली आहे. परंतू, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
याच दरम्यान, भारत सरकारच्या
गृह सचिव विभागाने 11 मार्च 2026 रोजी दिलेल्या अर्धशासकीय पत्रात जनगणनेचे काम करत असलेल्या कर्मचार्‍यांना बदली प्रक्रीयेतून वगळण्यात यावे, असे निर्देश दिले. परंतू, जिल्हा परिषद कर्मचारी बदली प्रक्रीया ही राज्याच्या ग्रामविकास विभागातंर्गत असल्याने बदली प्रक्रीया राबवायची की नाही याबाबत प्रशासन संभ्रमात सापडले होते. यातच, राज्याच्या ग्रामविकास उप सचिव वैशाली डिगे यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना शुक्रवारी (दि. 17) पत्र काढले आहेत. यात जनगणना ही देशातील अत्यंत महत्त्वाची व वैधानिक प्रक्रिया असून ती जनगणना अधिनियम, 1948 व जनगणना नियम, 1990 अंतर्गत राबविण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. जिल्हा परिषदांमधील विविध विभागांतील कर्मचारी, विशेषतः गट क व ड संवर्गातील कर्मचारी तसेच शिक्षकवर्ग, जनगणना कामात महत्त्वाची भूमिका बजावतात. याच पार्श्‍वभूमीवर शासनाने सन 2026 साठी नियोजित सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बदलीमुळे कर्मचा-यांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण भागात जनगणना काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षित व अनुभवी कर्मचार्‍यांची आवश्यकता असते. त्यामुळे सध्याच्या कार्यरत कर्मचार्‍यांना त्यांच्या ठिकाणीच ठेवणे आवश्यक असल्याचे शासनाने नमूद केले आहे.

आरोग्याच्या बदल्या होणार
दरम्यान, आरोग्य विभागातील बदली प्रक्रीया ही राबविली जाणार आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी हे जनगणना प्रक्रीयेत फारसे सहभागी नसून त्यांच्याकडे जबाबजदारी नसते. त्यामुळे या विभागातील कर्मचारी बदली प्रक्रीया राबविण्याबाबत 15 एप्रिल रोजी आरोग्य विभागाने दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles