विवाह ठरलेल्या तरुणीला धमकी तरुणीची आत्महत्या; पाथर्डी तालुक्यात तरुणावर गुन्हा दाखल

पाथर्डी -तालुक्यातील एका एकवीस वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, या प्रकरणी एका युवकाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी ही शेवगाव येथील एका महाविद्यालयात एमसीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. कुटुंबीय शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असून ती शिक्षणासोबत घरच्या जबाबदार्‍याही सांभाळत होती. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथील यज्ञेश वाळके या युवकाने त्या तरुणीला वारंवार फोन करून तिच्याशी लग्न करण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या युवकाने संबंधित विद्यार्थिनीचे इतर ठिकाणी ठरलेले लग्न मोडावे यासाठी तिच्या नातेवाईकांनाही फोन करून माझे तिच्यावर प्रेम आहे तिचे लग्न लावू नका असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दि. 14 एप्रिल 2026 रोजी रात्रीच्या सुमारास संबंधित युवकाचा फोन आला होता. त्यानंतर 16 एप्रिल रोजी सकाळी व पुन्हा सायंकाळी त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनीने त्या युवकाशी काही मिनिटे संवाद साधल्याचे समोर आले आहे.

या संभाषणानंतर अल्पावधीतच तिने घरातच विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तिला तातडीने शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान 17 एप्रिल 2026 रोजी पहाटे तरुणींचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून यज्ञेश वाळके या युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles