गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार असल्याच्या फक्त चर्चा सुरू होत्या. केंद्र सरकार दरवर्षी मार्च अखेरपर्यंत महागाई भत्त्यात वाढ करत असतं. मात्र, या वर्षी मार्च महिना संपला तरीही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या वाढीबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. पण आज (१८ एप्रिल) अखेर केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांची वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आल्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी २ टक्क्यांचा वाढीव महागाई भत्ता हा १ जानेवारी २०२६ पासून लागू असणार आहे. म्हणजे एप्रिल महिन्याच्या व्यतिरिक्त जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचीही थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या बरोबरच दुसरीकडे आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


