सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा, लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे दागिन, चांदीची भांडी किंवा अजून काही वस्तू करता यावी असं प्रत्येकाचचं स्वप्न असतं. पण गेल्या काही काळात या दोन्ही धातूंनी जी उत्तुंग झेप घेतली होती, त्याने सामान्य माणसाच्या डोळ्यातलं (खरेदीचं) स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय अशी शंका येत होती. पण सोन्याचे-चांदीचे दर जसे वर चढतात तसे खालीही येतात, गेले काही दिवस हाच ट्रेंड सुरू होता. मात्र अशातच आज २१ एप्रिल २०२६ रोजी, मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २१ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,२८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४२,३४० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोन्यानंतर आणखी एक चकाकणारा धातू, चांदीबद्दल बोलायचं झालं तर दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर आज चांदीचा भाव घसरला आहे. यापूर्वी १७ एप्रिल रोजी एक किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली होती आणि त्यानंतर १८ एप्रिल रोजी ती एकूण १० हजार रुपयांनी महाग झाली. यानंतर रविवार १९ एप्रिल, म्हणजेच अक्षय्य तृतीयेला आणि त्यानंतरच्या दिवशीही भाव चांदीचे स्थिर राहिले. पण आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झाल्यास, मंगळवारी दिल्लीत चांदी १०० रुपयांनी स्वस्त होऊन २ लाख ७४ हजार ९०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.


