अहिल्यानगर-तालुक्यातील शेंडी बायपास व बुरूडगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही घटनांमध्ये कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे.
पहिली घटना शेंडी परिसरात घडली. प्रदीप भानुदास नन्नवरे (वय 15, रा. शेंडी बायपास) हा मुलगा हॉटेल किनाराच्या मागील बाजूस असलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. मात्र पोहत असताना तो पाण्यात बुडाला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचा भाऊ विकास अशोक नन्नवरे याने त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना बुरूडगाव परिसरात घडली. विशाल संजय बर्फे (वय 24, रा. सावतानगर, भिंगार) हा युवक बाळू पवार यांच्या विहिरीत बुडाला. घटनेनंतर त्याला त्याच्या नातेवाईकांनी खासगी रूग्णवाहिकेव्दारे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


