अहिल्यानगर: शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नालेगाव परिसरातील जनकल्याण रक्तपेढीजवळ एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. फिर्यादी करण दीपक लांडे (वय २१, रा. ठाणगे मळा, नालेगाव) हा रात्रीच्या सुमारास आपल्या घराकडे जात असताना ही घटना घडली.
जुन्या वादातून आणि भावाला केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शिवाजी बाबुराव अनभुले, संभाजी बाबुराव अनभुले आणि राहुल बाळासाहेब वाकळे या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राहुल वाकळे हा दुचाकी चालवत होता, तर शिवाजी अनभुले याच्या हातात लोखंडी चॉपर होता. आरोपींनी फिर्यादीला गाठून काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर पाठीवर आणि दंडावर वार केले. महे भावाला मारल्याचा बदला आहे असे ओरडत आरोपींनी लाकडी दांडयानेही बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर जखमी तरुणाने आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले, त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
—————————————————————————————————————————————————————————
भरदिवसा महिलेला अडवून मारहाण
अहिल्यानगर: शहरातील भिस्तबाग चौक परिसरात एका महिलेला अडवून तिला लाकडी दांडयाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना आरोपीने हा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी घरातून निघाली होती. यावेळी आरोपी अतुल कैलास तरटे याने महिलेला फोनवरून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने मोटारसायकलवरून येत महिलेचा रस्ता अडवला. मी तुझ्या मुलीला घेऊन जाणार असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. महिलेने विरोध केला असता, आरोपीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संतापलेल्या आरोपीने जमिनीवर पडलेल्या लाकडी दांडयाने महिलेच्या हातावर, पायावर आणि डोळ्याखाली गंभीर वार केले. मारहाण करतानाच आरोपीने मी पोलिसांना घाबरत नाही, सहा महिने जेलमध्ये राहिलो तरी पुन्हा बाहेर येऊन तुला जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.


