उष्माघाताचा फटका : प्राथमिक शिक्षिका उषा फापाळे यांचे हृदयविकाराने निधन
पारनेर : तालुक्यातील वाढत्या उष्णतेमुळे आणखी एक बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षिका तथा गारगुंडी येथील रहिवासी उषा पोपट फापाळे (कुलट) (वय ५०) यांचे उष्माघातामुळे हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने निधन झाले असल्याचे टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डाॅ.ऋत्विज म्हसके खिलारी यांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,फापाळे या दररोजप्रमाणे सकाळी गारगुंडी येथून दुचाकीवरून पिंपळगाव रोठा येथे शाळेत गेल्या होत्या. सध्या शाळा सकाळी भरत असल्याने दुपारी बारा वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर त्या प्रखर उन्हातच परतीच्या प्रवासाला निघाल्या. घरी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अंगात अशक्तपणा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागल्याने त्यांना तातडीने कान्हूर पठार येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या अगोदर ढवळपुरी येथील माळवडी मधील महीलेचा शेतात काम करताना मृत्यु झाला आहे.
दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, अशी सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
सध्या तालुक्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे दुपारी ११ ते सायंकाळी ४ या कालावधीत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास डोक्यावर टोपी, अंगावर हलकी सुती वस्त्रे वापरावीत आणि भरपूर पाणी पिण्यावर भर द्यावा – पी.जी.कांबळे,तालुका आरोग्य अधिकारी


