अहिल्यानगर – राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे.स्व.शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कामे आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ज्या माध्यमातून आपल्याला जनता निवडून देईल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीत अक्षय कर्डिले हे महायुतीचे उमेदवार आहेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यामध्ये प्रमुख लढत असणार आहे. एकूण 374 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया होणार असून, राहुरी मतदारसंघात 3 लाख 33 हजार 543 इतकी मतदारांची संख्या आहे.


