सध्या पोलीस कोठडीत असलेला वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबा याच्यासह त्याची पत्नी, मुलगा व मुलगी अशा चौघांच्या नावावर संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा, राहाता या ठिकाणी १३ मालमत्ता असल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. गडगेच्या आश्रमातून दोनशे चित्रफिती जप्त करण्यात आल्या असून, त्यात दिसणाऱ्या लोकांचीसुद्धा पोलीस चौकशी करणार आहेत. आपल्याला गडगेच्या उपचाराने बरे वाटले असे चित्रफितीत सांगणारे लोक खरे रुग्ण आहेत, की गडगेचे लोक आहेत, हेही तपासले जाणार आहे.
दरम्यान, फरार असलेला आरोपी डॉ. मोहन पुरी हा गडगेच्या औषध पुरवठ्याचा सूत्रधार असून, त्याच्यावर यापूर्वीच नाशिकमध्ये चार गुन्हे दाखल असल्याने तो आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. आज, शुक्रवारी संगमनेरमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे या वेळी उपस्थित होते.
गडगेचे जप्त करण्यात आलेले व्हिडिओ ‘फॉरेन्सिक ऑडिट’साठी पाठवण्यात आले आहेत. त्याची सत्यता पडताळली जाऊन प्राप्त अहवालाचा पुरावा म्हणून उपयोग केला जाणार आहे. गडगेने स्थापलेला ट्रस्ट नोंदणीकृत असून, त्यावर सात विश्वस्त आहेत. विविध बँकांमध्ये दहा ठिकाणी बाबाची खाती असून, त्यावर पाच ते पन्नास हजारांपर्यंतचे व्यवहार झालेले आहेत.
दरम्यान, गडगेला डॉ. मोहन पुरी औषध देत असल्याचे समोर आले आहे. पुरी याच्यावर नाशिक जिल्ह्यात यापूर्वीचे चार गुन्हे दाखल आहेत. त्याचीही पडताळणी केली जाणार आहे.
डॉ. पुरी हा संगमनेरमधीलच बी. जी. डेरे आयुर्वेद महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्याची कागदपत्रे मिळाली आहेत. मात्र, चार वर्षांची पदवी मिळवण्यासाठी त्याला तब्बल सात वर्षे लागल्याचेही समोर आले आहे. सिन्नर येथे त्याचा औषध कारखाना असून, पोलिसांनी त्या कारखान्यातही तपासणी केली. गडगेचा आश्रम आणि या कारखान्यातून औषधांचे नमुने घेऊन तेदेखील तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. डॉ. पुरी हा गडगेला ज्याप्रमाणे औषधपुरवठा करत होता, त्याप्रमाणे इतरही अनेक भोंदूंना औषधपुरवठा करत असावा, असा पोलिसांचा अंदाज असून, त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी सांगितले.
उपचाराची प्रसिद्धी मिळावी यासाठी गडगे याने समाजमाध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते. ते पथक चित्रफिती तयार करून आश्रमाच्या समाजमाध्यमातील खात्यावर सामायिक करत होते. त्यातूनच गडगेकडे मोठ्या प्रमाणावर रुग्ण येऊ लागले होते आणि आश्रमाची प्रसिद्धी वाढली होती. समाजमाध्यमातील या चित्रफितींमुळेच गडगेचा भोंदूपणा उघडकीस आल्याचेही पोलिसांनी अधोरेखित केले.रुग्णांवर उपचार करताना इंग्रजी शब्दांची पखरण करणारा गडगे हा अवघा दुसरी शिकलेला आहे. सुरुवातीला संगमनेरमधीलच एका वकिलाकडे तो सालगडी म्हणून कामाला होता. नंतर तो गवंडीकाम करू लागला. पाणी साठवण्यासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या टाक्या बनवण्यात तो निष्णात झाला होता. त्यानंतर वडगाव पान येथे छोटे मंदिर त्यांने उभारले होते. डॉ. पुरी या गडगेच्या संपर्कात आल्यानंतरच त्याचा भरभराटीचा काळ सुरू झाल्याने या प्रकरणातील डॉ. पुरी यावर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
भोंदू गडगेबाबाच्या जिल्ह्यात १३ मालमत्ता; वडगाव पानच्या आश्रमातून २०० चित्रफिती जप्त
- Advertisement -


