महाराष्ट्र दिनी जिंजी किल्ल्यावर स्वच्छता व संवर्धन
आपला मावळाची तामिळनाडू मध्ये मोहीम
वर्षभराच्या गडसंवर्धन मोहिमेचा परिपाक
शिवनेरी ते जिंजी असा प्रवास
स्वराज्याच्या तिसऱ्या राजधानीत स्वच्छता मोहीम व भगवा ध्वज फडकावून अभिमानाचा संदेश देशभर
अहिल्यानगर : सह्याद्रीच्या कुशीत सुरू झालेली गड-किल्ले स्वच्छता आणि संवर्धनाची चळवळ आता राज्याच्या सीमा ओलांडत ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे. खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून “आपला मावळा” या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही मोहीम थेट तमिळनाडूपर्यंत पोहोचत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त (दि. १ मे) तमिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ला येथे विशेष स्वच्छता मोहीम आणि भगवा ध्वज फडकावण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोणा, प्रतापगड, विश्रामगड, भुदरगड, सिंहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, लोहगड यांसारख्या गडांवर शेकडो स्वयंसेवकांच्या सहभागातून स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन आणि जनजागृती उपक्रम सातत्याने राबविण्यात आले. “गड आपला, जबाबदारी आपली” हा संदेश रुजवत या मोहिमेने युवकांना इतिहासाशी जोडण्याचे मोठे कार्य केले. याच चळवळीचा विस्तार म्हणून आता जिंजी किल्ल्यावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
तमिळनाडूमधील जिंजी किल्ला हा स्वराज्याच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर या किल्ल्याला विशेष स्थान प्राप्त झाले, तर पुढे तो स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला. भव्य तटबंदी, डोंगररांगा आणि अभेद्य रचना यामुळे जिंजी किल्ला हा भारतातील सर्वात सुरक्षित किल्ल्यांपैकी एक मानला जातो.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनी या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून भगवा ध्वज फडकावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमातून केवळ स्वच्छता नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि स्वराज्याच्या परंपरेचा अभिमान देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या मोहिमेत सहभागी होणारे स्वयंसेवक गड परिसरातील कचरा हटविणे, स्वच्छता राखणे, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत. यासोबतच गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत माहिती देत जनजागृती केली जाणार आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त या ऐतिहासिक स्थळी भरतनाट्यम, पोवाडा, ढोल-ताशे, मल्लखांब, लाठी-काठी यांसारख्या पारंपरिक कलांचे सादरीकरण करण्यात येणार असून, महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक ऐक्य अधोरेखित केले जाणार आहे.
इतिहासाच्या दृष्टीने जिंजी किल्ल्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दक्षिण मोहिमेनंतर या किल्ल्याचे सामरिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले. पुढे छत्रपती राजाराम महाराज यांनी औरंगजेबाच्या मुघल सैन्याशी लढा देताना जिंजी किल्ल्यावरून जवळपास ७-८ वर्षे मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. त्यामुळे हा किल्ला स्वराज्याच्या जिद्दीचा आणि पराक्रमाचा अजरामर प्रतीक ठरतो.
तसेच, या मोहिमेस तामिळनाडू राज्यातील तंजावर येथील छत्रपतींच्या वंशातील मान्यवर बाबाजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे, ही या उपक्रमाची विशेष गौरवाची बाब आहे. तंजावर हे दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र असून, मराठा साम्राज्याच्या प्रभावाखाली येथे मराठा राज्यकर्त्यांनी दीर्घकाळ राज्य केले. विशेषतः व्यंकोजी (एकोजी) राजे भोसले यांनी तंजावरमध्ये मराठा राज्याची स्थापना केली आणि तेथील संस्कृती, कला व प्रशासनावर मराठ्यांचा ठसा उमटवला.
जिंजी किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या युनेस्कोच्या वारसा जतन संकल्पनेशी सुसंगत असा हा उपक्रम असून, वारसा संवर्धनाची जागतिक जाणीव निर्माण करण्याचा देखील यामागे उद्देश आहे.
“आपला मावळा”च्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ आता एक व्यापक लोकचळवळ बनत असून, राज्याच्या सीमा ओलांडून देशपातळीवर पोहोचत आहे. महाराष्ट्र दिनी जिंजी किल्ल्यावर होणारा हा उपक्रम गडसंवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या पत्रकार परिषदेसाठी खा.निलेश लंके, आपला मावळा संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, उपाध्यक्ष नगरसेवक योगीराज गाडे, प्रा. सीताराम काकडे, आदित्य जीवनगोरे (धाराशिव), अविनाश बानकर, जीशान शेख (सोलापूर) आदी उपस्थित होते.


