शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार,पण… बच्चू कडूंनी अटी शर्ती सांगितल्या

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडूंची प्रहार संघटना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या विलिनीकरणानंतर बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाईल, अशीदेखील शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर खुद्द बच्चू कडू किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणतीही अधिकृत भूमिका मांडली जात नव्हती. अखेर आज स्वत: बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. यात विलिनीकरणासाठी सकारात्मक असल्याचे सूतोवाच बच्चू कडूंनी दिले.
बच्चू कडूंनी यावेळी माध्यमांमधील चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “मलाही माहिती नव्हतं की मी विधानपरिषदेचा उमेदवार होऊ शकतो. उद्या मला विधानपरिषद उमेदवारी मिळाली, तर ती माध्यमांमुळे असेल. मी एका जातीचा किंवा धर्माचा माणूस नाही. मी शेतकरी-दिव्यांगांचं काम करणारा माणूस आहे. जर मला एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिली तर दिव्यांगांचा-मजुरांचा सन्मान होईल. आम्ही मुद्द्यांची लढाई लढणारी माणसं आहोत. आमचा जर विचार झाला, तर आमचे काही मुद्दे आहेत”, असं बच्चू कडू म्हणाले.

यावेळी बच्चू कडूंनी विलिनीकरणाची पूर्वअट म्हणून काही मुद्दे मांडले. “दिव्यांगांच्या उर्वरीत मुद्द्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा मुद्दाही आहे. पदांसाठी युती करणारा बच्चू कडू नाही. इतर पक्ष तशा युती करतात. पण बच्चू कडू मुद्द्यांसाठी युती करेल. मुद्दे असतील, तरच आम्ही पुढचं पाऊल टाकू”, असं ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles