गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ
सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
दरवाढीच्या शक्यतेमुळे सर्वसामान्यांची उडाली झोप
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत आज शुक्रवारी वाढ झाली. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेमुळे सर्वसामान्यांची झोप उडाली आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.तर मागील चार वर्षांपासून किरकोळ दर स्थिर असल्याने तेल कंपन्यांचं नुकसान वाढत आहे. नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, सरकारच्या सूत्रांनी भविष्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा दावा फेटाळून लावला आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या आठवड्यात वाढून प्रति बॅरल १२६ डॉलरवर पोहोचल्यात. त्यानंतर किंचित घसरण झाली. त्यामुळे किंमती ११० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली.
इराण-अमेरिकेमधील तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील कच्च्या तेलाच्या जहाजाच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. दुसरीकडे इराणच्या कारवाईने आंतरराष्ट्रीय बाजारात उलथापालथ सुरू आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाच्या जहाजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.
मागील आठवड्यात पेट्रोलियम मंत्रालयात एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘मागील ४ वर्षांत किरकोळ किंमती स्थिर राहिल्याने पेट्रोलमागे प्रति लीटर २० रुपये आणि डिझेलमागे प्रति लीटर १०० रुपयांचं नुकसान होतंय. त्यावेळी किंमती वाढवण्याची कोणतीही योजना आखली नव्हती. मागील वर्षांत कच्च्या तेलाची किंमत ७० डॉलर प्रति बॅरल इतकी होती. आता चार महिन्यात ११४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत २५ रुपयांपासून २८ रुपये प्रति लीटरपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता आहे.


