नेवासा फाटा येथील ‘त्रिमूर्ती’चे सचिव मनीष घाडगेंच्या अंत्यविधीला अध्यक्षांसह मान्यवर अनुपस्थित, चर्चेला उधाण

अहिल्यानगर-त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगेपाटील यांचा अंत्यविधी शुक्रवारी (दि. १) सायंकाळी नेवासे फाटा येथील संकुलाच्या प्रांगणात शोकाकुल वातावरणात पार पडला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र संस्थेच्या अध्यक्षा अॅड. सुमतीताई घाडगेपाटील, त्यांच्या कुटुंबीयांसह काही विश्वस्त व एका प्राचार्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली असून, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले.घाडगेपाटील यांच्या निधनानंतर अंत्यविधी नेमका मूळ गावी तेलकुडगाव येथे करायचा की नेवासा फाटा येथे, याबाबत दिवसभर एकमत न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी नेमके कुठे जावे, याबाबत अनेक जण अनिश्चिततेत होते. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास पार्थिव नेवासा फाटा येथील संकुलात आणण्यात आले आणि तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, संस्थेतील काही जबाबदार पदाधिकारी अंत्यविधीवेळी संपर्काबाहेर (‘नॉट रिचेबल’) असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीबाबतही विविध शंका उपस्थित केल्या जात होत्या.प्राथमिक माहितीनुसार, मनीष घाडगेपाटील यांनी त्यांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर संस्थेतील काही संबंधित व्यक्ती संपर्काबाहेर राहिल्याने अंत्यविधीला त्यांची अनुपस्थिती अधिकच चर्चेचा विषय ठरली. या प्रकरणाबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सचिव मनिष घाडगे यांच्या मृत्युला संस्थेतील प्रॉपर्टी वादाची पार्श्वभूमी असून त्यातून त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. संस्थेच्या पदाधिकारी आणि प्राचार्यांच्या सततच्य मानसिक छळामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्षा सुमती साहेबराव घाडगे, उपाध्यक्षा स्नेहल साहेबराव घाडगे, सहसचिव श्रृती साहेबराव घाडगे, प्राचार्य सोपान बाजीराव काळे, अनुराधा उत्तम गोरे हे कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. 28 एप्रिल रोजी त्रिमूर्ती संस्थेचे सचिव मनिष घाडगे यांनी स्वत:ला पेटवून घेतल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र त्यामागील कारण समोर आले नव्हते. 1 मे रोजी मनिष यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी मनिषा यांनी नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.गत वीस वर्षापासून मनिष घाडगे हे त्रिमूर्ती संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. संस्थापक साहेबराव घाडगे यांचे 10 जून 2025 मध्ये निधन झाल्यापासून मनिष यांना त्रास देण्यास सुरूवात केली. संस्था ताब्यात घेण्याचा हेतू त्यामागे होता. मनिष व त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली वैयक्तिक मालमत्ता स्नेहल व श्रृती घाडगे यांच्या नावे करून द्यावी यासाठी विद्यमान अध्यक्ष सुमती घाडगे, उपाध्यक्षा स्नेहल घाडगे, सचिव श्रृती घाडगे यांनी प्राचार्य काळे व गोरे यांना हाताशी धरून बदनामी व खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले. कथित ठराव घेत मनिष यांच्या सचिव पदाचे अधिकार काढण्याचाही प्रयत्न झाला. त्या ठरावावर सही करण्यासाठी दबाव आणल्यानंतरही मनिष यांनी सही केली नाही. त्यामुळे कथित व्हिडीओ दाखवत बदनामीची धमकी दिली गेली. सततच्या धमक्या, मानसिक छळामुळे मनिष घाडगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles