अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना गटनेते पदावरून हटवले; माजी आमदार वैभव पिचड यांना धक्का

नगरपंचायतीमधील सत्ताधारी भाजपअंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना गटनेते पदावरून हटविण्यात आले आहे. नगराध्यक्षांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांचे जागी गटनेतेपदी तमन्ना मोसीन शेख यांची निवड केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले असून नगराध्यक्ष वडजे तसेच पक्षाचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांना हा धक्का आहे.

वडजे यांच्या विरोधातील सदस्य पुढील काळात काय भूमिका घेणार? वडजे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला जाणार काय? तसेच या घडामोडीबाबत भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार यावर नगरपंचायतीचे आगामी राजकारण अवलंबून आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नगरपंचायतमध्ये भाजपअंतर्गत कुरघोडीचे राजकारण सूरू आहे. नगरपंचायतमध्ये माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपची एकहाती सत्ता आहे. १७ पैकी १२ नगरसेवक भाजपचे आहेत. या १२ पैकी बहुसंख्य नगरसेवकांचा वडजे तसेच उपनगराध्यक्ष शरद नवले यांना विरोध आहे.

गेल्या एक दीड वर्षापासून नाराज सदस्य वडजे व नवले यांनी राजीनामा द्यावा यासाठी प्रयत्नशील होते. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी त्या संदर्भात अनेकवेळा या दोघांचे विरोधात तक्रारी केल्या होत्या व त्यांचे राजीनामे घेण्याची मागणी केली होती. मात्र पक्षश्रेष्ठींकडून त्याची दखल घेतली गेली नाही तसेच दोन्ही गटात समन्वय घडवून आणण्याचे प्रयत्नही झाले नाहीत. मध्यंतरी नाराज सदस्यांनी वडजे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते तसेच त्यांच्याविरुद्ध तक्रारीही केल्या.

पक्षश्रेष्ठींकडून न्याय मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर या सदस्यांनी वडजे व नवले यांच्याविरुद्धची आपली मोहीम अधिक तीव्र केली.
नगरपंचायतमधील भाजपप्रणीत अकोले शहर आघाडी गटाच्या ९ सदस्यांची बैठक घेऊन गटनेतेपदावरून बाळासाहेब वडजे यांची हकालपट्टी केली तसेच गटनेतेपदी नगरसेविका तमन्ना मोसिन शेख यांची एकमताने निवड केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यापुढे सुनावणी होऊन गटनेतेपदी झालेली तमन्ना शेख यांची निवड ग्राह्य धरण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles