राहुरी – स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी तब्बल १ लाख १२ हजार मताधिक्क्यांनी विजय मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. अक्षय कर्डिले यांना १ लाख ४० हजार ९३ मते मिळाली. एकूण मतांपैकी सुमारे ७५ टक्के मतदान कर्डिले यांना मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यासह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदारांपैकी १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत सरासरी ५६.२० टक्के मतदान झाले होते. सोमवारी (दि.४ मे) सकाळी ८ वाजता राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मतमोजणी सुरु झाली. एकूण २० टेबलवर २७ फेर्यांद्वारे ही मतमोजणी पूर्ण झाली. अक्षय कर्डिले यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिली. नंतरच्या फेर्यांमध्ये त्यांची आघाडी वाढत गेली आणि विक्रमी १ लाख १२ हजार ५८७ मतांच्या मताधिक्क्याने अक्षय कर्डिले यांनी विजय मिळविला.
या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके तर अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे, महेश हापसे, अथर्व म्हसे, सुरेश लांबे असे ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जोरदार प्रचार केला होता. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत त्यांनी आपले वडील स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याप्रमाणेच लोकांची कामे करण्याची आश्वासने देत लोकांचा विश्वास संपादन केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, अहिल्यानगरच्या महापौर ज्योतीताई गाडे अशा अनेक दिग्गजांनी कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे कर्डिले यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. त्यांच्या प्रचारात तरुणांची मोठी टीम सक्रीय झाली होती. राहुरी शहरापेक्षा राहुरीच्या ग्रामीण भागातून कर्डिले यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
अक्षय कर्डिले यांच्या झंझावातापुढे मोकाटे यांच्यासह इतर सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. डिपॉझिट रक्कम वाचविण्यासाठी एकूण वैध मतांपैकी १६.६६ टक्के मते मिळविणे आवश्यक होते. मात्र, कोणत्याही उमेदवाराला डिपॉझिट वाचविण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.


