पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गावात सुरू असलेल्या यात्रेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात शेवटच्या टप्प्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील सुस्ते इथे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पार पडलेला. त्यावेळी या कार्यक्रमात तुफानी गर्दी पाहायला मिळाली. पण, त्यानंतर दोनच दिवसांत पार राधा पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. त्या कार्यक्रमात मात्र मोठा राडा झाला.पंढरपूरमधील सुस्ते गावात यात्रेच्या पार्श्वभूमीवर नृत्यांगना राधा पाटील हिचा भव्य नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरळीत सुरू होता आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. सुरुवातीला शब्दांत सुरू झालेला वाद काही वेळातच हाणामारीत रुपांतर झाले.
धक्काबुकी, आरडाओरडा, शिवराळ भाषा… नंतर हा राडा आणखीनंच वाढत गेला आणि मोठा गोंधळ झाला. त्यानंतर राधा पाटीलचा कार्यक्रम बंद करण्यात आला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी गौतमी पाटील हिचाही कार्यक्रम जत्रेच्या काळात घेण्यात आला होता. मात्र तुफानी गर्दी होऊनही हा कार्यक्रम शांततेत पार पडला. मंगळवारी झालेल्या राधा पाटीलच्या कार्यक्रमात मात्र, याच्या विरुद्ध परिस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रम चांगला रंगला, पण अखेरच्या टप्प्यात दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली आणि याचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं.
कार्यक्रमातील वाद वाढत गेल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. वाढता तणाव पाहता आयोजकांनी राधा पाटील हिचा कार्यक्रम तात्काळ बंद केला. पोलिसांनी गर्दी पांगवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
सुस्ते गावात दोन राजकीय पार्ट्या असून एका राजकीय पार्टीनं गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला होता, तर दुसऱ्या राजकीय पार्टीनं राधा पाटील हिचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं. कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादावादीत कोणताही राजकीय रंग नसला, तरी किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीमुळे कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.


