१ मे महाराष्ट्र दिनी आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक तथा अधिकारी यांना फेटे बांधले नाही या कारणास्तव चंद्रपूर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युद्धीष्टर रैंच, भांडार प्रमुख सिद्धिकी अहमद या दोघांना तर याच दिवशी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी कार्यालय वेळेत उघडले नाही आणि दारू पिऊन असल्याच्या कारणाने महापौर व उपमहापौर यांच्या कक्षावरील दोन शिपाई अशा चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ.अशोक ऊईके, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिरे तथा सर्वपक्षाचे नगरसेवक तसेच जिल्हाधिकारी पंत, आयुक्त अकनुरी नरेश यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या सर्वांना कार्यक्रम स्थळी फेटे बांधले नाही तसेच कार्यक्रमस्थळी बॅनर लावले नाही.
महापालिकेत महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव हे ध्वजारोहणासाठी आले असता शिपायांनी सकाळी कार्यालय उघडले नव्हते. ते दोघेही दारू पिवून असल्याचे लक्षात आले. त्यामुळे खांडेकर यांच्या कार्यालयातील शिपाई जेजीलवार आणि उपमहापौरांच्या कार्यालयाचे शिपाई बोते यांचे निलंबन करण्यात आले आहे. या चौघांच्याही निलंबनाचा आदेश ४ मे रोजी काढण्यात आला.


