पश्चिम आशियातील तणाव थांबण्याचे संकेत मिळताच जागतिक बाजारपेठेत मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. विशेषकरुन सोन्या-चांदीच्या किमतीने पुन्हा उसळी घेतली आहे. कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने डॉलर कमकुवत झाला. परिणामी सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळले आहेत. यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर गाठला असून, चांदीनेही ऐतिहासिक उसळी घेतली आहे.
राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.५२ लाख रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याची किंमतही १.३९ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या किमतीत सुमारे २,९०० रुपयांची वाढ झाल्याने सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५२ लाख रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. दक्षिण भारतात सोन्याची मागणी अधिक असल्याने चेन्नईत किमती इतर शहरांच्या तुलनेत अधिक उच्चांकी स्तरावर पोहोचल्या आहेत.
केवळ सोनेच नाही, तर चांदीनेही गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या रसामुळे दिल्लीत चांदीचा भाव २.६५ लाख रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात मोठी दरवाढ मानली जात आहे.


