राज्यपाल ‘त्या’ अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?

तमिळनाडूच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येत आहे. टीव्हीके पक्षाने मोठा राजकीय निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. डीएमके किंवा एआयएडीएमके यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास TVK चे सर्व 108 आमदार राजीनामे देतील, असा दावा सूत्रांनी केला आहे. या घडामोडींमुळे तमिळनाडूच्या सत्तासमीकरणात मोठी राजकीय अनिश्चितता निर्माण झाली असून पुढील काही तास तामिळनाडूच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. विजय थलपती यांच्या TVK पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 108 जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 च्या संख्याबळाची गरज आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोघांचे एकत्रित संख्याबळ 113 इतके झाले आहे. विजय थलपति दोन मतदारसंघातून निवडून आल्यामुळे टीव्हीकेचे प्रत्यक्ष संख्याबळ 107 इतकेच मोजले जाईल. त्यामुळे टीव्हीके आणि काँग्रेस आघाडीचे एकत्रित संख्याबळ 112 इतकेच भरते. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना आणखी सहा आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.गेल्या दोन दिवसांपासून थलपती विजय यांच्या पक्षाकडून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहेत. थलपती विजय यांनी आतापर्यंत दोनवेळा तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली आहे. मात्र, दोन्हीवेळा त्यांना आधी 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणा, तरच मी तुम्हाला सत्तास्थापनेचे निमंत्रण देतो, अशी भूमिका घेतली आहे. एरवी राज्यपाल निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात आणि नंतर संबंधित पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागते. मात्र, तामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे तामिळनाडूत सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. TVK ला स्पष्ट बहुमत मिळण्यात अपयश आल्याने द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यानंतर आता DMK ने पक्षप्रमुख एम.के स्टॅलिन यांना राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये तामिळनाडूच्या राजकारणात कोणता ट्विस्ट येणार का, हे बघावे लागेल.
दरम्यान, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या भूमिकेमुळे टीव्हीके पक्षाच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काल टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांना लोकभवनाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. आज पुन्हा एकदा टीव्हीकेडून राजभवनाच्या परिसरात आंदोलन केले जाईल. काँग्रेस नंतर डाव्या पक्षांकडून विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला जाऊ शकतो. दोन्ही डाव्या पक्षांचे चार आमदार आहेत. त्यांनी साथ दिल्यास थलपती विजय यांच्याकडील संख्याबळ 116 इतके होईल. डाव्या पक्षांकडूनही राज्यपालांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles