अहिल्यानगर- मतदार यादी नोंदणी, मतदान प्रक्रिया, शासकीय सर्वैक्षण अशी शाळा बाह्य कामं म्हटल्यावर शिक्षकांची नकारघंटा असते. त्यात आता राष्ट्रीय जनगणना सुरू झाली आहे. या कामातूनही सूट मिळण्यासाठी अनेक शिक्षक प्रयत्न करत आहेत. मात्र नगरमधील एका शिक्षकाने जनगणनेचे काम मिळावे यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालत ऑर्डरसाठी विनंती केली.
येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांना जनगणना 2026-27 चे आदेश मिळाले नाहीत.परंतु त्यांना जनगणनेचे राष्ट्रीय काम करण्याची इच्छा होती.दोन-तीन फेऱ्यांमध्ये वाट पाहून ऑर्डर न मिळाल्याने शेवटी शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे जनगणना आदेश प्राप्त होऊन जनगणनेचे काम करता यावे म्हणून निवेदन स्वरूपात अर्ज दिला.
सकारात्मकता दर्शवत मा. जिल्हाधिकारी यांनी अर्ज स्वीकारत मनोदय व्यक्त केला की “आपल्याला प्राप्त शासकीय आदेशाचे वेळोवेळी तंतोतंत पालन व्हावे यातून स्वतः ची,प्रशासनाची ,समाजाची,संस्थेची व जिल्ह्याची प्रतिमा निश्चितच उंचावत असते.”
त्याचबरोबर अहिल्यानगरकरांनी स्व जनगणना करण्याबरोबरच इतरांना देखील जनगणना करण्यासाठी प्रोत्साहित करावे म्हणून शिक्षक डॉ.बागुल यांनी “माझा भारत- माझी जनगणना” हे वेबपेज देखील तयार केले आहे.यावर भारताच्या जनगणना मोहिमेतील शासकीय उच्चपदस्थ व्यक्ती, प्रशासकीय कार्यालये यांची जनगणनेची आव्हाने ,संदेश ,व्हिडिओ व प्रक्रियेच्या ग्राफिक इमेजेस यांचा समावेश आहे.


