सरकारच्या ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (पीएमआयएस) 2026‘ अंतर्गत देशामध्ये 31 हजार 480 हून जागेवर विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत, जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत इंटर्नशिपचा कालावधी साधारणपणे 6 किंवा 9 महिन्यांचा असणार आहे. इंटर्नशिपदरम्यान उमेदवारांना दरमहा रुपये नऊ हजार इतके विद्यावेतन देण्यात येणार असून इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.
योजनेसाठी पात्रतेचे निकष: उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असावे. उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा बीए.बीएस्सी, बीकॉम, बीसीए, बीबीए, बीफार्मा शाखेत आदी पदवीधर उमेदवारांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. पूर्णवेळ नोकरी करणारे किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. मात्र ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेणारे उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीही अर्जासाठी पात्र असतील.
या योजनेत महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, बजाज अलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनी, बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड, एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि., बीव्हीजी इंडिया लिमिटेड, कॉग्निझंट, आयबीएम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अशा नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवारांनी मर्यादित कालावधीत https://pminternship.mca.gov.in
या संकेतस्थळावर नोंदणी करून रिक्त पदांसाठी अर्ज करावा.


