आणखी एका भोंदूला बेड्या, पैशांचा पाऊस पाडतो म्हणत लाखो लुबाडले, माढ्यातील धक्कादायक प्रकार

माढा तालुक्यातील आडेगाव येथे भोंदूगिरी करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आणखी एका तथाकथित बाबाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर भोसले प्रकरणानंतर आता गुरु माऊली उर्फ नाना महाराज वीरकर याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फसवणूक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या प्रकरणामुळे अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यातील आडेगाव येथे आश्रम उभारून नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर हा अनेक वर्षांपासून भोंदूगिरी करत होता. जादूटोणा, भविष्य सांगणे, पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवणे अशा प्रकारांनी तो लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींचा त्याच्याकडे वावर असल्याने त्याचे बस्तान अधिक मजबूत झाले होते.

पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाने वीरकर महाराजाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 2024 पासून या तरुणाला व्यवसायात मोठा फायदा करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. “माझ्याकडील कासव घे, तुझ्याकडे पैशाचा पाऊस पडेल,” असे सांगून त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र व्यवसाय वाढण्याऐवजी त्या तरुणावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.

पीडित तरुणाने आतापर्यंत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आज पहाटे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दोन लाख 35 हजार रुपयांच्या फसवणुकीची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुरु माऊली वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास वीरकर यांना आडेगाव येथील आश्रमातून ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास टेंभुर्णी पोलीस करत असून आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. या कारवाईमुळे माढा तालुक्यात खळबळ उडाली असून भोंदू बाबांविरोधात नागरिकांनी सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles