लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
ईकेवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता
महिलांनी सरकारकडे केली मागणी
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, अनेक महिलांचा हप्ता कायमचा बंद करण्यात आला आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ईकेवायसी. ईकेवायसी न केलेल्या महिलांचे लाभ बंद झाले आहे. ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२६ होती. त्यापूर्वी ज्या महिलांनी केवायसी केली त्यांचाच लाभ सुरु ठेवण्यात आला आहे. दरम्यान, याचसोबत ईकेवायसीमध्ये चुका दुरुस्त केलेल्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. आता महिलांनी ईकेवायसीची डेडलाइन वाढवण्याची मागणी केली आहे.लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.याचसोबत ईकेवायसीत दुरूस्तीदेखील न केलेल्या महिलांना लाभ मिळत नाहीये. दरम्यान, सोलापूरातील जवळपास १ लाख महिलांनी ईकेवायसी केलेली नाही. त्यामुळे पात्र असतानाही या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यामुळे लाभ कायमचा बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे. यामुळे महिलांनी जिल्ह्याच्या बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करुन मुदतवाढीची मागणी केली आहे. एक संधी मिळावी, असं सांगितले आहे. परंतु अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. १५ किंवा १६ मे रोजी महिला व बालकल्याण आयुक्त, उपायुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीत चुकीची माहिती दिली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. ज्या महिलांची केवायसी बाकी आहे त्यांना आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी, यासाठी अर्ज केले आहे. आम्ही पत्रव्यव्हार करुन त्यांची मागणी कळवळी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही मागणी केली जात आहे. असं अविनाश मगर, सोलापूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी सांगितले, याबाबत सकाळने वृत्त दिले आहे.


