नगर तालुक्यातील लग्नसमारंभातील सोन्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 16 तोळे सोने हस्तगत

अहिल्यानगर : लहान मुलांकरवी लग्न समारंभातून सोन्यावर डल्ला मारणाऱ्या छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले. चोरट्यांचा मोहल्ला ओळख असलेल्या मध्यप्रदेशातील चार गावात जोखीम पत्कारून दोन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी 16 तोळे सोने हस्तगत केले. यापूर्वी बसमधून चोरी झालेले सोने कोतवाली पोलिसांनी मोठ्या कौशल्याने हस्तगत केले होते. आता लग्न समारंभातून चोरी गेलेल्या सोन्याचा छडा लावत कौतुकास्पद कामगिरी केली.

सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डनमधील साखरपुडा समारंभातून शिक्षिका सिंधू महेश माने यांनी सोने ठेवलेली कापडी पिशवी 2 मे रोजी चोरी झाली होती. तसा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला. त्या पाहणीत अल्पवयीन मुलगा चोरी करत असल्याचे दिसून आले. यापूर्वीही शहरात लग्न, साखरपुडा तसेच कौटुंबिक समारंभातून लहान मुलांनी चोरी झाल्याचे प्रकार घडलेले होते. तीच टोळी पुन्हा सक्रीय झाल्याचा संशय बळवताच पोलिसांनी त्या मुलाची शोध मोहीम हाती घेतली. तपासाअंती थेट मध्यप्रदेशातील टोळीचा सुगावा लागला.पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे सहाय्क पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे, अंमलदार विनोद बोरगे, विशाल दळवी, सुरज कदम यांचे खास पथक थेट मध्यप्रदेशात पोचले. मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बोटा पोलिस ठाण्यातंर्गत चार गावांत या पोलिस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबविले. ज्या गावात पोलिसांनी शोध मोहीम राबविली ती गावे चोरांचा मोहल्ला म्हणून ओळखली जातात. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या अल्पवयीन मुलाचा छडा लावण्याकरीता त्याच्या नातेवाईकांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले. सुरूवातीला ते नाकबुल गेले, पण सीसीटीव्हीत कैद चित्रीकरण दाखवतच त्यांनी कबुली दिली. त्यानंतर चोरीचे 16 तोळे पोलिसांच्या हवाली केले. चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी नोटीस दिली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.कोतवालीचे पोलिस ज्यावेळी त्या गावात पोहचले, त्याचवेळी तेथे दिल्ली, गोवा आणि उत्तर प्रदेशचे पोलिसही अशाच प्रकारच्या गुन्ह्याच्या तपासासाठी आले होते. राजगड जिल्ह्यातील चार गावात लहान मुलांकरवी चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रीय आहेत. अशा गावात जात तेथून 16 तोळे सोने हस्तगत करणे ही धाडसी कारवाई मानली जाते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles