तीन महिलांचा गर्भपात,डॉक्टरला प्रत्येकी १० हजार तर एजंटला मिळत होता ३ हजार रूपयांचा मोबदला; अहिल्यानगर मधील घटना

बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणातील अटक आरोपींना न्यायालयाने १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल झालेल्या सुनावणीत पोलिसांनी आरोपींच्या वाढीव कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने ही मागणी मान्य केली.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन डॉक्टर, चार एजंट तसेच संबंधित गर्भवती महिलांचे सहा पती यांचा समावेश आहे. श्रीरामपूर येथील एका डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान आणखी दोन आरोपींचा सहभाग समोर आला असून, हे दोघे पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. नेवासा येथील डॉ. भणगे आणि प्रदीप ढगे यांनी गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन या दोघांकडून खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांकडून या दोन्ही आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. दरम्यान, या रॅकेटमधून ज्या गर्भवती महिलांची गर्भलिंग चाचणी करण्यात आली होती, त्यांची ओळख पटवून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.

काही महिलांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यापैकी तिघींचे गर्भपात झाल्याचे तपासात समोर आले आहे. हे गर्भपात अटक आरोपींच्या दवाखान्यात काही एजंटांच्या मदतीने करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात या संपूर्ण प्रकारामागे एजंटांचे मोठे जाळे सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. नेवासा येथील डॉ. भणगे आणि प्रदीप ढगे यांच्या ताब्यातील सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान केले जात होते. यासाठी संबंधित डॉक्टरांना प्रत्येकी दहा हजार रुपये, तर एजंटांना प्रत्येकी तीन हजार रुपये मोबदला दिला जात होता. एकापेक्षा अधिक एजंट सहभागी असल्यास त्यानुसार रकमेची वाढ केली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. एजंट आठ ते दहा गर्भवती महिलांचा गट तयार करून ठरावीक दिवस आणि वेळ निश्चित करत असत. संबंधित महिलांना त्यांच्या पती किंवा नातेवाईकांसह बोलावले जात असे. महिलांकडून रोख रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना एका ठिकाणी थांबवले जाई. त्यानंतर एजंट संबंधित महिलांना चारचाकी वाहनातून अज्ञातस्थळी घेऊन जाऊन गर्भलिंग निदान चाचणी करत असत. चाचणी पूर्ण झाल्यानंतर महिलांना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांकडे आणून सोडण्यात येत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles