अहिल्यानगर-शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरूध्द कठोर पावले उचलत पाच जणांना जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. अहिल्यानगर शहर पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावर निर्णय घेत उपविभागीय दंडाधिकारी (अहिल्यानगर भाग) सुधीर पाटील यांनी संबंधित आदेश पारित केले आहेत.
शहरातील कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांविरूध्द हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची चौकशी करून शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी अहवाल उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांच्याकडे सादर केला होता. हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये अजित रामदास केकाण (वय 22, रा. संत भगवानबाबा चौक, सारसनगर), करण खंडू पाचारणे (वय 31, रा. एमआयडीसी, नागापूर), गौरव प्रभाकर साळवे (वय 30, रा. सिध्दार्थनगर), मंगेश अरूण थोरात (वय 31, रा. यशोदानगर, पाईपलाईन रस्ता) आणि संग्राम रमेश गीते (वय 24, रा. केडगाव) यांचा समावेश आहे. यापैकी गौरव साळवे व संग्राम गीते यांच्यावर प्रत्येकी दोन वर्षांसाठी जिल्हाबंदीची कारवाई करण्यात आली आहे. तर अजित केकाण, करण पाचारणे आणि मंगेश थोरात यांना सहा महिन्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.
संबंधित सराईत गुन्हेगारांविरूध्द विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपअधीक्षक डॉ. टिपरसे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखान्याचे निरीक्षक जगदीश भांबळ, भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर तसेच पोलीस अंमलदार महेश मगर, शिल्पा कांबळे, रेखा पुंड आणि हेमंत झिने यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


