कांद्याच्या दरवाढीसाठी नगर-कल्याण महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

पारनेर : प्रतिनिधी

कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी टाकळी ढोकेश्वर येथे नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे नेते तथा नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. कांद्याला तातडीने हमीभाव जाहीर करावा, निर्यातबंदी हटवावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, थकीत वीजबिले माफ करावीत तसेच पीकविम्याचा लाभ तत्काळ द्यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल,” असा इशारा रवींद्र राजदेव यांनी यावेळी दिला.

आंदोलनामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पारनेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यात आल्यानंतर मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, महिला आघाडीच्या नेत्या सोनिया राजदेव, नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर, सरपंच प्रकाश गाजरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, ज्येष्ठ नेते शशिकांत आंधळे, शहराध्यक्ष संदीप मत, लखन ठाणगे, जालिंदर लंके, विक्रम काळे, विश्वास शेटे, सरपंच शिवाजी निमसे, पोपट गुंड, संदीप ठाणगे, सरपंच अभिजित झावरे, प्रकाश राजदेव, भाऊसाहेब चौधरी, भानुदास आग्रे, बाळासाहेब चिकणे, संतोष चिकणे, साहेबराव चिकणे, शिवराम चिकणे, रामभाऊ थोरात, सरपंच बापू ठुबे, आयुब हवलदार, गंगाराम चिकणे, रामदास साळवे, बापू नरड, पोपट नरड, राजेंद्र शेरकर, विकास दगाबाज, जयवंत वाळुंज यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी तत्काळ मार्ग करून दिल्याने आंदोलनस्थळी माणुसकीचे दर्शन घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles