खासदार लंके यांच्या कामांवरून विखेंना नगराध्यक्षा कावरे यांचा टोला
पारनेर :
पारनेर शहराच्या नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पारनेर दौऱ्यावर जोरदार टीका करत तालुक्यातील पाणीटंचाई, टँकर व्यवस्थापन आणि विकासकामांच्या श्रेयावरून गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. पालकमंत्री साहेब पारनेरमध्ये पाणीटंचाई बैठकीसाठी आले होते की स्वतःचे नावाचे डफडे वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
डॉ. कावरे यांनी म्हटले आहे की, पारनेर तालुक्याच्या दौऱ्यात पालकमंत्र्यांकडून काही भरीव घोषणा किंवा ठोस निर्णयांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात दौरा केवळ राजकीय शक्तिप्रदर्शनापुरताच मर्यादित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. पाणीटंचाई बैठकीत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी म्हटले की, तालुक्यात दरवर्षी मार्च महिन्यापासून टँकर सुरू होतात, मात्र यंदा मे महिना संपत आला तरी अनेक गावांत टँकर व्यवस्था सुरू झालेली नाही. हे पालकमंत्री म्हणून मोठे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.
टँकर पुरवठ्याचे कंत्राट घेतलेला ठेकेदार गायब झाल्याने संपूर्ण व्यवस्था कोलमडली असून याबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पारनेर तालुक्याची भौगोलिक रचना आणि अल्प पर्जन्यमान लक्षात घेता अनेक गावांना मार्च ते जून या कालावधीत टँकरवर अवलंबून राहावे लागते. वारंवार मागणी करूनही टँकर सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये संताप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी डॉ. कावरे यांनी खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांचाही उल्लेख केला. देवीभोयरे फाटा- पारनेर -सुपा- खडकी मार्ग, न्यायालय इमारत, बस डेपो, पळशी येथील आश्रमशाळा यांसारखी कामे लंके यांनी मंजूर करून आणल्याचा दावा करत पालकमंत्री केवळ इतरांनी मंजूर केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठीच आले होते का? असा सवाल त्यांनी केला. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणे बंद करा आणि तालुक्याला स्वतः काहीतरी भरीव द्या,” अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला.


