केंद्रीय अन्वेषण विभागाने लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे.सध्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे.
शिवराज मोटेगावकर हे शैक्षणिक वर्तुळात मोठे नाव असून लातूर, पुणे आणि नांदेड येथे त्यांच्या आरसीसी क्लासेसच्या शाखा आहेत.
मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर, आता त्यांचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ या वर्षीची नीट परीक्षा संपल्यानंतरचा आहे, ज्यामध्ये मोटेगावकर परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.
https://x.com/andharesushama/status/2056351512536940643?s=20
या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांना विचारत आहेत की, “आरसीसीच्या मॉक टेस्ट सिरीजमधून प्रश्न आले होते का?” यावर उत्तर देताना एक विद्यार्थिनी सांगते की, “हो, आपल्या टेस्ट सिरीजच्या बाहेरील एकही प्रश्न आला नव्हता.” व्हिडिओमध्ये पुढे एक विद्यार्थी अत्यंत धक्कादायक प्रतिक्रिया देताना दिसतो. तो म्हणतो, “सर, तुम्ही जे १०१ प्रश्न दिले होते, त्याच प्रश्नांमधून परीक्षेत प्रश्न आले होते.” यावर मोटेगावकर अत्यंत आत्मविश्वासाने, “आरसीसीचे पेपर मोर दॅन सफिशियंट (गरजेपेक्षा जास्त) आहेत,” असे सांगताना दिसत आहेत.
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आल्याने पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.


