आयपीएल 2026 च्या हंगामात काल चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादने 5 विकेट्सने चेन्नईचा पराभव केला. हैदराबादने या विजयासह प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. तर प्लेऑफच्या पात्रतेसाठी चेन्नई आता दुसऱ्या संघावर अवलंबून असणार आहे.
चेन्नई आणि हैदराबादच्या सामन्यात चेन्नईचा खेळाडू एमएस धोनीने (MS Dhoni) सगळ्यांचं लक्ष वेधलं. दुखापतीमुळे हैदराबदविरुद्धचा सामनाही एमएस धोनी खेळू शकला नाही. त्यामुळे चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची निराशा झाली. परंतु पहिला डाव संपल्यानंतर टीम फोटोसाठी एमएस धोनी 7 नंबरची पिवळी जर्सी घालून मैदानात उतरला. यावेळी मैदानात इतका आवाज झाला की मैदानात कॉमेंट्री करण्याऱ्यांनाही त्यांचा एकमेकांचा आवाज ऐकू येत नव्हता. चेन्नईने काल एमए चिंदबरम स्टेडियमवर या हंगामातील शेवटचा सामना खेळला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या सर्व खेळाडूंनी मैदानात एक टीम फोटो काढला. यासाठी जेव्हा एमएस धोनी मैदानात आला, तेव्हा चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र फोटो काढल्यानंतर जेव्हा एमएस धोनी ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला, तेव्हा मैदानाची सीमारेषा ओलांडताना त्याने मान वर करुन आकाशाच्या दिशेने पाहिले. एमएस धोनीच्या याच कृतीमुळे एमएस धोनी आता खेळाडू म्हणून आयपीएलच्या पुढील हंगमात खेळताना दिसणार नाही. धोनीने निवृत्तीचे संकेत दिले. धोनीची ही शेवटची झलक होती, अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तसेच तू ना जा मेरे बादशाह…हे गाणं टाकून चाहते भावूक पोस्टही करत आहेत.


