विधानपरिषद निवडणुक… नगरच्या जागेसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही…
अहिल्या नगर: राज्यात विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पक्षीय बलाबल पाहता या सर्वच जागांवर राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचे प्राबल्य आहे. विरोधी महाविकास आघाडीला नगण्य स्थान आहे. मात्र सत्ताधारी महायुतीत प्रत्येक जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी एक सदस्य निवडून जाणार आहे. या जागेसाठी भाजपकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र मागील निवडणुकीतील गणिते पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नगरच्या जागेसाठी आग्रही आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी नगरच्या जागेसाठी आग्रही भूमिका मांडली असून महायुतीच्या राजकारणात नगर जिल्ह्यात पक्षाला बळकटी देण्यासाठी धनुष्यबाण चिन्हावरील उमेदवार देण्याची मागणी केली आहे.
नगर जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून तीन – चार जण इच्छुक आहेत शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा आहे शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय अंतिम राहील असे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने नगर जिल्ह्यात प्रा राम शिंदे, विवेक कोल्हे, सुनील कर्जतकर यांना विधानपरिषदेत संधी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय समतोल राखण्यासाठी भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला संधी देण्याची मागणी होत आहे


