सीना नदी पात्र पाहणी झाली, पण प्रश्न सुटला नाही
आता बाधितांच्या संयमाचा अंत पाहू नका – किरण काळे
पूररेषा प्रश्नावर ठाकरे शिवसेना आक्रमक होणार
अहिल्यानगर : सीना नदीच्या पूररेषेमुळे निर्माण झालेल्या समस्यां बाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी बाधित नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी ठाकरे शिवसेना शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे. प्रशासन, शासनाच्या गंभीर चुकी मुळे हजारो नगरकर त्रस्त आहेत. सीना नदी पात्राची आजवर अनेक वेळा पाहणी झाली, बैठका झाल्या. पण प्रश्न काही सुटला नाही. आता बाधितांच्या संयमाचा अंत पाहू नका. अन्यथा ठाकरे शिवसेना आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.
काळे म्हणाले की, सीना नदी आणि संबंधित नाल्यांच्या पूरनियंत्रण रेषांमुळे शहरातील हजारो जमीनधारक, प्लॉटधारक आणि नागरिक अडचणीत आले आहेत. चुकीच्या पद्धतीने आखण्यात आलेल्या पूररेषेमुळे अनेक भागातील बांधकामयोग्य क्षेत्र प्रभावित झाले असून नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक कुटुंबांनी आयुष्यभराची जमा-पूंजी खर्च करून प्लॉट खरेदी केले, मात्र आता त्या जागेवर बांधकाम करता येत नसल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
किरण काळे म्हणाले, या प्रश्नामुळे शहराच्या विकासालाही मोठा फटका बसत आहे. हजारो प्लॉटधारक आणि व्यावसायिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून या विषयाचा सर्वंकष अभ्यास करून पूररेषेचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून काही बैठका पार पडल्या होत्या. खात्याचे मंत्री, अधिकाऱ्यां समक्ष प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी करत नुसते फोटोसेशन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात प्रश्न सुटला नाही. आता बाधितांचा अंत पाहू नये. वेळ प्रसंगी ठाकरे शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.
बाधित नागरिकांना आवाहन करताना काळे यांनी सांगितले की, या परिस्थितीत कोणत्याही नागरिकाने निराश होऊ नये. प्रभावित नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी ठाकरे शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. हा केवळ काही व्यक्तींचा प्रश्न नसून हजारो कुटुंबांच्या भविष्याशी संबंधित विषय आहे.
प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणार :
किरण काळे म्हणाले, यापुढे शासन, प्रशासन आणि संबंधित विभागांकडे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ठाकरे शिवसेनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. बाधितांना न्याय मिळावा, पूररेषेचा पुनर्विचार व्हावा आणि सर्वांना दिलासा देणारा मार्ग काढावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातील, असे काळे यांनी म्हटले आहे.


