सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात ‘कॉकरोच जनता पार्टी’ या उपरोधिक डिजिटल संघटनेनं धुमाकूळ घातला असून या संघटनेनं सरकारवर केलेल्या आरोपांची चर्चा होत आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
ण्णा हजारे यांनी म्हटलं आहे की, “नवीन राजकीय पक्षाचं नाव झुरळ असलं तरी या पक्षाच्या मागे तरुण मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. या पक्षाचं नाव झुरळ हे ठेवण्याचा उद्देश काय होता, हे समजून घेतलं पाहिजे. झुरळ जरी म्हटलं असेल, ते नाव जरी योग्य वाटत नसेल तरी या पार्टीच्या मागे तरुण उभे राहिले हे महत्त्वाचं आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असं समजून शासनाने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे,” असं आवाहन हजारे यांनी सरकारला केलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच ‘सीजेपी’चे अधिकृत एक्स खाते भारतात ब्लॉक करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी या संघटनेने नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करून मोहीम सुरू केली होती.
शनिवारी एक्सवर माहिती देताना दीपके म्हणाला, ‘सीजेपी’चे मुख्य इन्स्टाग्राम पेज आणि माझे वैयक्तिक खाते हॅक झाले आहे. मुख्य ट्विटर खाते आधीच ब्लॉक होते आणि आता बॅकअप खातेही काढून टाकण्यात आले आहे. आमचे कोणत्याही प्लॅटफॉर्मवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे यापुढील पोस्ट अधिकृत मानल्या जाऊ नयेत. ‘सीजेपी’चे संकेतस्थळही आता बंद पडले आहे. पेपर फुटीवर उत्तरदायित्व मागितल्यामुळेच ही कारवाई होत असल्याचा टोला त्याने लगावला.


