राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने एकीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही बैठकांचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच आज (२९ मे) महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीचा विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.नुकतंच मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी महाविकासआघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकासआघाडी सर्व जागा लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि अटीतटीचा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार? याची घोषणा करण्यात आली आहे.जागावाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित
मविआच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राज्यातील १५ जागांचा तिढा सुटला असून पक्षांनुसार संभाव्य जागावाटप खालीलप्रमाणे असणार आहे. यात काँग्रेस ८, शिवसेना ठाकरे गट ४ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.
काँग्रेस : चंद्रपूर-यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर आणि पोटनिवडणूक असलेल्या नागपूर या ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितली आहे.
शिवसेना (ठाकरे): रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार ) : पुणे, ठाणे, सातारा-सांगली या तीन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्ष निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितली आहे.


